Saturday 13 August 2011

वाचन छंद .. की गरज ?



ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर जगाची खरी ओळख आपणास होत असते. या कक्षा रुंदावण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे वाचन होय. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलय..  प्रसंगी अखंडीत वाचित जावे याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न झाला तर प्रत्येकाला त्याचा फायदा होईल. अर्थात ज्यांना अक्षर ओळख नाही त्यांसाठी तर काला अक्षर भैंस बराबर अशी स्थिती असते परंतु ज्यांना शिक्षण मिळालय त्यांनी वाचायलाच हवं ते म्हणतात ना वाचाल तर वाचाल.
            मुलाखतीमध्ये सर्वसाधारपणे एक प्रश्न सर्वांना विचारला जातो. आपला छंद   काय ? यावर बहुतेक उमेदवारांचं उत्तर असतं वाचन. अर्थात आपल्याला यापेक्षा दुसरं उत्तर देता येत असलं तरी हॉबी म्हटलं की रिडींग म्हटल्यावर कसं वजन पडतं. इथंच सगळे चुकतात. मुळात वाचन हा छंद असू शकत नाही. वाचन हा आपल्या जीवनाचा अतिशय अत्यावश्यक भाग असला पाहिजे.
            एखाद्या कुंडीत काळी माती टाकून आपण रोपटं लावलं आणि त्याला दररोज पाणी दिलं तर ते रोपटं वाढेल कालांतराने पाणी साठा पडत पडत ती माती एकजीव होईल. त्याचे कण चिटकतील परिणामी हवा खेळणार नाही मुळे त्या घट्ट होणाऱ्या मातीसोबत दबत जातील परिणामी रोपटं सुकेल. हुशार माळी अधून-मधून त्याची मशागत करुन पुन्हा माती मोकळी करतो जेणे करुन रोपटं जगतं आणि फलतं. मनाचंही तसंच असतं. सातत्यानं एकाच पठडीत जगून ते घट्ट होत असतं त्याची वेळोवेळी मशागत झाली नाही तर .. मात्र अवघड आहे.
            रोपट्यानं मातीतल्या सर्व पोषक सत्वांचा वापर केल्यावर त्याला अधून-मधून खत टाकलं नाही तरी त्याची वाढ खुंटेल. वाचनाचं खत आपल्या मनात टाकून चैतन्य आणण्याची काम करतं. आपली ती बौध्दीक भूक आहे म्हणून वाचन हा छंद होवू शकत नाही. ती गरज असते. इतरांची मते ऐकणं त्यावर चर्चा करणं म्हणजे मनाची मशागत करणं होय. हे आपण सातत्यानं करत रहायला हवं. आपलं व्यक्तिमत्व रुबाबदार ठेवायचं असेल आणि खुलवायचं असेल तर अशी मनाची मशागत गरजेची ठरते.
आम्ही वाचन करतो म्हणजे काय करतो. ज्ञान केवळ शास्त्रातच असतं असं नाही. वाचन कोणतही करा त्यामुळे ज्ञानात भरच पडणार आहे. माणूस हा शिक्षणानं मोठा होत जाणारा प्राणी  आहे. किमान आजची व्यवस्था त्याला महत्व देते. कोणत्याही पदासाठी काही किमान निकष लावलेले असतात यात महत्वाचा निकष लावलेले असतात यात महत्वाचा निकष शिक्षणाचा असतो. अर्थात शिक्षण घेताही
माणसं  लखपती होताना दिसतात. त्याचं कारण बुध्दीमत्ता आणि अनुभव हे आहे.
मात्र प्रत्येकाला हे जमणार आहे का ?  नाही  शिक्षण घेतलेला माणूस कुशलतेने वाटचाल करतो. वाचन आणि चर्चेतून   ज्ञानवृध्दी करुन तो यशाच्या शिखरापर्यंत इतरांच्या तुलनेत वेगात आणि कमी वेळात पोहोचत असतो.
            रात्री पुस्तक हातात घेतल्याशिवाय झोप येत नाही असं सांगणारे अनेक आहेत. केवळ झोप येत नाही म्हणून पुस्तक वाचणाऱ्यांचा हेतू झोपेचा असतो. त्यामुळे  ज्ञानग्रहण कमी होतं. आपण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला हवा परंतु `चार पल की जिंदगी `  त्यासाठी कमी पडते म्हणून इतरांचे अनुभव आपण वाचनामधून अनुभवू शकतो हा वाचनाचा मोठा फायदा आहे.
आपल्याकडील ज्ञान पुढच्या पिढीला द्यावं ही प्रत्येक प्राण्याची धडपड असते. इतर प्राणी आपापल्या पध्दतीने ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत देतात. मानवाच्या जाणीवा विकसित  झाल्यानंतर शब्द आणि भाषा या माध्यमातून      ज्ञान पाठांतराच्या रुपात पुढे सरकलं भूर्जपत्रापासून मुद्रण युगापर्यंत लिहून ठेऊन ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा मोठा प्रवास   झालेला आहे. जाणाऱ्या पिढीनं मिळवलेलं ज्ञान आपण उपयोगात आणू शकतो मात्र त्यासाठी वाचत राहणं गरजेचं आहे. म्हणून वाचनाला छंद म्हणून सांगता वेगळं स्थान देण्याची गरज आहे.        
टि.व्ही.मुळे वाचन कमी झालं अशी हाकाटी सध्या दिसते. याचा कारणांचा आणि लोकप्रियतेचा शोध घेऊन त्यातून सर्वांनी बोध घ्यायला हवा. प्रत्येक माध्यमानं स्वत:चं असं स्थान निर्माण केलयं. लेखकांनी याचं भान ठेवून लिखाण केलं तर वाचक मिळत नाही अशी तक्रार त्यांना करावी लागणार नाही. नव्या पिढीला ज्ञान द्यायचं ते त्यांच्या पध्दतीने द्यावं  लागेल `वंदेमातरम्` चं महत्व नव्या पिढीला ए.आर.रहेमान चांगलं सांगू शकला. याचं कारणं त्याला नव्या बदलांशी जुळवून घेता आलं. अखंडीत वाचन करावं असं आपण नव्या पिढीला सांगता त्यावेळी विदेशी पुस्तकांच्या देशी आवृत्ती आपण देता कामा नये. बदलत्या काळातही मुळ मानवी मुल्यं बदललेली नाहीत याकडे आपणही लक्ष द्यावं हे चांगलं.
            वाचनाच्या माध्यमातून आपण कमीत कमी वेळात आणि श्रमात ज्ञान मिळवू शकतो. वाचनातूनच आपण प्रेरणा मिळवू शकतो. जगायचं कसं हे कुणालाही सांगण्याची गरज नाही परंतु जगण्याची पध्दत कशी असावी हे पुस्तकं सांगतात म्हणूनच वाचनाचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि त्यात बदल होणार नाही मग वाचन करण्याचा छंद सोडून वाचनाची सवय लावताय ना .. !
 -प्रशांत दैठणकर
                                                            

No comments: