Monday 15 August 2011

स्वातंत्र्य दिन आजचा... कालचा...!


15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कोण उत्साहाचा दिवस आदल्या दिवशीच तयारी सुरु व्हायची. छावणीतून दुर्गा स्टोअर्स मधून आणलेल्या `ब्रासो ` ने एन.सी.सी.चा बिल्ला चकचकीत करायचा. त्यात चेहरा तीन वेळा बघायचा बूट देखील तसेच घासून पॉलिश लावून चक्क करायचे.      युनिफॉर्मला स्टार्चच्या पाण्याने धूवून वाळवायचं कोप-यावरच्या नामदेवच्या इस्त्रीच्या दुकानात त्याची इस्त्री होईपर्यंत कडक कर अजून असा धोशा लावायचा मग तो परिटघडीचा युनिफॉर्म कागदात गुंडाळून सांभाळत घरी आणायचा.
     रात्री झोपताना आईला चार वेळा आठवण द्यायची सकाळी लवकर उठव हं, जणू ती इतक्या तयारीनंतर झोपेतून उठवणारच नव्हती. बाल मन आणि त्याचे ते भितीचे खेळ मात्र आजदेखील रात्री झोपताना वडिलांना फोन करतो अणि सांगतो मला सकाळी लवकर जायचय मला प्लीज फोन करा आता 14 ते 41 काहीच फरक पडलेला नाही.
     शाळेतला कार्यक्रम म्हणजे संपूर्ण संस्थेचा कार्यक्रम प्राथमिक, माध्यमिक शाळा, हायस्कुल तसेच कन्या शाळा आणि सायन्स व आर्टस-कॉमर्स कॉलेज असा सारा मेळा कॉलजच्या मागील लाल ग्राउंडवर असायचा पाहुणे कोण आणि ते काय सांगतात याकडे लक्ष कमी पण वातावरणातल्या त्या देशभक्तीवर गीतांनी अचानक वीरपणा अंगी आल्याचं वाटायचं
     जग इकडचं तिकडं झालं तरी चालेले पण झेंडावंदन मिस करायच नाही अगदी सायन्स कॉलेज सोडेपर्यंत नाही केलं.
     आज सकाळी कन्या जान्‍हवीला फोन केला तिच्याही बोलण्यातून तोच उत्साह जाणवत होता कालच तिने एन.सी.सी.च्या युनिफॉर्मची तयारी, बुट पॉलिश  आदी केलेलं शाळेत 25 जणींत तिची निवड झालीय हल्ली शाळांमध्ये ध्वजारोहणाला कोणताही एक वर्ग बोलवण्याची पध्दत सुरु झालीय यंदा नववीचा वर्ग परंतु एन.सी.सी. मुळे आपणही जावू शकतो हा आनंद जानूच्या बोलण्यातून जाणवत होता. सकाळची तिची लगबग फोनवरच ऐकली आणि मला माझे एनसीसीचे दिवस आढवले.
   असंख्य तरुणांनी प्राणाची आहुती दिली त्यानंतर आपणास स्वातंत्र्य मिळालय हे सांगावं लागतं हे दुर्देव आहे. तिरंग्याला मानवंदना देणे हे देवदर्शनपेक्षाही अधिक महत्वाचे आहे. ते आपल्या 18 पगड जातीच्या देशाचं अधिष्ठान आहे. याची जाणीव सा-यांनी ठेवली पाहिजे.
     स्वातंत्र्य दिन म्हणजे पिकनिक असं मानून गाडयांवर पेट्रोल तुडवत आणि बिअर ढोसत फिरणा-या पिढीची खरोखरच किव येते तुम्हाला राष्ट्रासाठी वेळ नाही तर तुम्ही राष्ट्राकडून काही मागण्याचा तुम्हाला अधिकारही नाही या पध्दतीने या सगळयांना वागणूक द्यायला हवी असं वाटतं.
     रस्त्यांवर आजही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह दिसतोय अर्थात वर्धेत इथं आधुनिकता आली असली तरी लोकांनी मातीशी नातं सोडलं नाही म्हणूनच इथं ध्वजारोहण पुन्हा एक गौरवशाली अनुभव ठरतो.
जयहिंद     जयमहाराष्ट्र

- प्रशांत दैठणकर

No comments: