Friday 30 September 2011

प्रतिमेला प्रतिभेचीच प्रेरणा



हातात पेन्सील आणि समोर कागद आल्यावर त्याच्या डोळ्यात एक आगळी चमक दिसते. त्या पांढऱ्या शुभ्र कागदावर मग पेन्सीलची आंदोलने सुरु होतात. रेषांवरून रेषांचे आक्रमण तर कधी मिलाफ असा प्रवास रंगत असताना त्याच्या चेहऱ्यावरील रेषांपैकी एकही रेष हलत नाही. एकाग्रता... यातून अल्पावधीत हुबेहुब पेक्षाही अधिक अशी ही प्रतिमा साकारते. अशा या कलाकाराचं नाव आहे चंद्रकांत पाठक आणि गाव आहे चंद्रपूर.
बैठकीच्या निमित्तानं चंद्रपूरला गेल्‍यावर तेथील विश्रामगृहात मुख्य सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर यांचं भव्य असं तैलचित्र आहे. ते छायाचित्रच असल्याचा भास होतो. १९५६ साली नागपूर इंथ दीक्षा भूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा सोहळा झाला. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे १६ ऑक्टोबर १९५६ ला चंद्रपूर इथं असाच सोहळा झाला. यावेळी काढलेल्या एका छायाचित्रावरून हे तैलचित्र रेखाटलं आहे.
कुतूहल जागं झाल्यानं सहकारी अनिल ठाकरेला विचारलं त्यावेळी त्यानं क्षणाचा विलंब न लावता थेट चंदूला फोन लावला. चंदू पाठक नावानं इथं प्रसिद्ध असणारी ही वल्ली अर्ध्या तासात आमच्या भेटीला हजर झाली.
चंदूची भेट झाल्यावर त्याच्या कलेचा प्रचंड असा खजिनाच उघडला गेला स्वामी पद्मनाभ मंदिराच्या तळघरातील खजिन्याप्रमाणे चंदूचा खजिना खूप मोठा आहे. याची सुरुवात कधी बालपणीच्या एका उपक्रमात झालेली चंद्रपूर जवळच्या वरोरा इथलं पाठक कुटुंबिय, वडील शाळेत मुख्याध्यापक.
मुलांना सर्जनशीलता शिकता यावी यासाठी त्यांनी गावात अनेक जणांकडे असणाऱ्या वस्तू जमा करून त्यांचे प्रदर्शन भरविण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांना दिला होता. त्यात सर्जनशिलतेचा परिचय झाल्यावर चंदूने आजवर त्याचं बोट सोडलं नाही.
मनाच्या कोपऱ्यातला छंद आणि त्यानुसार उदरनिर्वाहराचं साधन असा योग चंदूच्या नशिबी असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागात आरेखकाची नोकरी करीत त्यानं छंद जपलाय.
गेली सलग ११ वर्षे अभिताभ बच्च्नच्या वाढदिवसाला भेटून त्याचं सुंदरसं पेंटींग देण्याचा उपक्रम चंदू करतो. वैदर्भिय नेते शांताराम पोटदुखे यांच्या पाठींब्यावर त्याला अनेक महत्वाच्या व्यक्तींची भेट घेता आली. याचं सोनं करीत त्यानं सर्वांच्या प्रतिमा रेखाटल्यात.
छायाप्रतिमा अर्थात फोटोग्राफर याला १५० वर्षांचा इतिहास आहे. मात्र त्यापूर्वीच्या काळापासून पेंटींगच्या माध्यमातून अनेकांना आपण बघितलय. चंदूची मास्टरी खूप वेगळी आहे. तो तैलचित्र रेखाटतो पण ते छायाचित्र भासतं. प्रतिमा आणि प्रतिबिंबांच्या या जगात या प्रतिभावंतानं घेतलेली भरारी खूपच मोठी आहे.
लता मंगेशकर, डॉ. कलाम, सोनिया गांधी, राजीव गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंह आणि अनेक नावे या कलाकाराच्या कुंचल्यातून साकारली आहेत. त्याचं हे योगदान खूप मोठं आहे. सायंकाळी कार्यालय झाल्यावर ३ ते ४ तास रोज वेळ देत चंदूने आपलं कलाप्रेम जपलयं... असा हा कलाकार भेटणं हा देखील सुंदर योग म्हणावा... नंतर बैठक सुरु झाली मात्र मन त्या चित्रात गुंतलं होतं हे खरं.


प्रशांत दैठणकर

Thursday 29 September 2011

माझं नवरात्र १९८० सालचं

पहाटे चार वाजता थंडगार पाण्यानं आई अंघोळ घालायची अर्धवट झोपेतल्या स्थितीत बिटकोच्या काळया दंतमंजनने दात घासलेले, पाण्याचा पहिला तांब्या अंगावर पडताच खडकन सारी झोप उडून जायची आसपासच्या घरांमध्येही पहाटे पहाटे हीच लगबग हेच ते ऑक्टोंबरचे दिवस साधारण 1980-81 चा तो काळ.

औरंगाबाद शहर आज वेगात धावतय. त्यावेळी केवळ रेंगायला लागलं होतं दोन वेळा पाणी येणार गावात गर्दी नाही रस्ते मोकळे असं ते छोटेखानी शहर. सकाळची ही लगबग असायची कर्णपूरा येथील मंदिरात जाण्यासाठी.

संस्थान गणपती हे जसं ग्रामदैवत तसंच स्थान नवरात्रात कर्णपूरा येथील भवानी मातेच्या मंदिराला गल्लीतल्या सर्वच घरातून बायका-मुलांचे जथ्ये कर्णपु-याकडे जायचे त्यावेळी रहायचं ठिकाण होतं दलालवाडी येथून टिळकपथ ओलांडून एस.बी.कॉलनीतून समर्थनगर माधून या देवीभक्तांच्या टोळया मार्गस्थ व्हायच्या. समर्थनगर ओलांडताना एक अनामिक भिती बालमनात असे प्रचंड वाढलेला बाभळी आणि संपूर्ण कब्रस्थान असणारं हे समर्थनगर इतकं बदलेल असं त्यावेळी वाटलं नव्हतं.

समर्थनगरातून बाबा पेट्रोलपंपाच्या चौकातून वळलं की कर्णपु-याचा मार्ग सुरु साधारण एखाद किलोमीटर आत गेल्यावर ते कर्णपुरा देवीचं मंदिर. भक्तीभावाने माथा टेकून त्यालगत असलेला बालाजी मंदिराचं दर्शन आणि बाहेर पडताना कपाळावर चंदनाचा टिका सुंदर डिझाईन असणारे टिळे लावणारी मुलं तिथं उभी असायची आणि पाच पैशांमध्ये टिका लावायचे.

हा टिका वाळेपर्यंत वाटबघणे आणि तो तसाच मिरवत सकाळी शाळेत जाणे हा आवडता उपक्रम. पहाटे उठून कर्णपु-यात जाऊन आल्याची ती खूण असायची ना.

सुट्टीच्या दिवशी हा कार्यक्रम जरा मोठा व्हायचा कर्णपु-याच्या देवीचं दर्शन घेतल्यनंतर जिल्हा न्यायालयाच्या मागे मनीषा कॉलनीत असणा-या रेणुकामातेचं देर्शन घ्यायचं कार्टाच्या मागे असणारं हे मंदिर त्यामुळे लोक याला कार्टाची देवीच संबोधायला लागले ते आजवर कायम आहे.

दोन्ही मंदिरात देर्शन झाल्यावर तिथं वडाच्या झाडाखाली जेवण्याचा उपक्रम आटोपयचा यात्रा भरत आल्यावर तेथून टीप-टीप असा आवाज करणारं अंगठयानं दाबायचं खेळणं घ्यायचं आरंभी बरं वाटल तरी नंतर त्यामुळे अंगठा दुखायला लागायचा खरेदी करुन दिलेलं हे खेळणं तसं चांगलच इरिटेट करणारं असल्यानं आई साठी ती एक विकतची डोकेदुखीच ठरायची.

काही उत्साही तरुण त्याकाळी एक वेगळा प्रकार करित असत सायकलच्या कॅरिअरला लोखंडी डबा बांधायचा. ओली नारळाची दोर त्या डब्यापासून चाकाच्या एक्सलला लावला की फिरणा-या चाकाबरोबर एक वेगळा नाद येत असे तो. आवाज आणि ती कर्णपु-यापर्यंत नवरात्राच्या नऊ दिवसांची प्रभातफेरी आजही अगदी ताजी आहे मनात.
                                                             -प्रशांत दैठणकर

Thursday 22 September 2011

Life begins @ 40


                       काही क्षण आयुष्याचे कधीच स्मृतीतून जात नाहीत. स्मृती हा प्रकार वेदनांशी अधिक जवळचा असतो हे देखील सत्य आहे. काळाच्या ओघात खूपकाही घडत असतं मात्र आपल्याला सुखाचे क्षण कमीच आठवतात. आठवण रहाते ती दुख-या क्षणांची.
     या प्रवासानं खूप काही दिलय. सर्वात महत्वाची ती अनुभवाची शिदोरी. अपेक्षा भंग होतो याचं मुळ कारण असतं अपेक्षा. या अपेक्षा जितक्या कमी तितकं अपेक्षा भंगाचं दु:ख कमी हा इथला न्याय. अपेक्षा दोन प्रकारच्या आपण इतरांकडून ठेवलेल्या अपेक्षा आणि इतरांना आपणाकडून असणा-या अपेक्षा.
     अपेक्षा ठेवताना त्या वास्तवाला धरुन असाव्यात जेणेकरुन निराशा होत नाही हे आपण इतरांबाबत सहज करु शकतो. मात्र इतरांनी आपणाकडून काय अपेक्षा ठेवावी याबाबत आपली भूमिका काहीच नसते. इतरांनी आपणाबाबत बाळगलेल्या अपेक्षा वास्तव की अवास्तव हे त्यांच्या मनातील आपल्या स्थानावर अवलंबून असते आणि यात आपल्याला त्रास असत नाही. अर्थात आपल्याकडून त्यांचा अपेक्षाभंग होणं ही त्यांच्यासाठी त्रासाची, चिंतेची बाब असते. एक मात्र खरं की आपण सर्वांच्या सर्व अपेक्षा कधीच पूर्ण करु शकत नाही.
     आपल्या अपेक्षांचं काय ?  याला उत्‍तर तेच जे आधी आलं आपल्या सा-या अपेक्षा देखील कधीच पूर्ण होत नसतात.
     अपेक्षा आणि अपेक्षाभंगाचा हा भावनिक खेळ वाढत्या आणि घटत्या मानसिक अंतरावर अवलंबून असतो.एखादी व्यक्ती खूप जवळ आली की खूप अपेक्षा वाटायला आणि वाढायला लागतात.
     जिव्हाळा, प्रेम आणि मैत्र यांचे बंध कधी इतके जवळ येतात की त्यात मुळ नातं आणि समोरची व्यक्ती यातलं अंतर प्रेमाची धुसर रेषा ओलांडतं आणि तिथं प्रभुत्ववाद शिरतो. प्रत्येकाचं व्यक्ती म्हणून असणारं व्यक्तीगत स्थान या प्रभुत्ववादानं संपल्यानं इथं पदोपदी अपेक्षा अन् अपेक्षाभंग असा उन-पावसाचा खेळ सुरु होतो अन् इथूनच `तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना `  असा नवा प्रवास नात्यांमध्ये दिसतो.
  भावनिक ओलावा, वात्सल्य आणि खंबीरपणाचं एक छत्र म्हणून उभं राहणा-यांना  भावनिक आंदोलनात उभं राहता येतं. यात हळवेपणा आला तरी मनाचा खंबीरपणा झालेल्या घटनांना समजून घेऊन अपेक्षाभंग पचवायचा आणि समोरच्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मनाच्या तळापासून प्रयत्न करायचा असा प्रवास सुरु होतो. इथं त्याच नात्याचा नव्याने जन्म होत असतो.

                ग्रीष्मात पोळलेल्या झाडाचं
                पालवी फुटणं हे वेगळं .... !
                                    आशा-अपेक्षांचं बीज गळालं..
                मातीला मिळालं म्हणताना
                भावनेच्या धुंद वर्षावात
                ते प्रेम पुन्हा अंकुरणं वेगळं
                असतं प्रत्येक मनात हे
               कोंडलेलं असं एक स्वप्न
              वासनेतून वात्सल्याकडे जाताना
                 त्या भावनेचा तो ओलावा
              ते स्वप्नं त्या ओलाव्यानं अंकुरतं
            म्हणून कदाचित पुन्हा जीवन बहरतं !

            आणि यामुळेच कदाचित सारे जण म्हणत असतात मित्रांनो
                                                                  Life begins at forty.


                                                       प्रशांत दैठणकर
                                   

Thursday 15 September 2011

आँख पर है पर्दा, पर नही वो अंधा.


काही क्षण न कळणारे
आणि काही न वळणारे

आयुष्याचंही असंच असतं. काही बाबतीत आपणास काहीच कळत नाही आणि काही बाबतीत कळत असतं पण मनाला पटत नाही म्हणून वळत नाही असं काहीसं आयुष्य आपण जगत असतो. काही बाबी आपणास आवडल्या तरी त्या मिळत नाहीत. कुबेराचा खजिना समोर असला तरी दारावरचा सेवक मात्र सेवकच असतो. आणि असच काही मला वाटतं ते औरंगाबादेत गुलमंडीवर अगदी सुपारी हनुमान मंदिराच्या दारासमोर बसणा-या त्या बिपीन दलाल बाबत.
हा बिपीन दलाल कोण.. सहाजिक असा सवाल. या मार्गावरून जाणा-या प्रत्येकानं त्याला बघितलं आहे. नजरेसमोर असूनही नजरेआड राहणारा हा बिपीन इथं अनेक वर्षांपासून लौटरी विकतो. मला जसं आठवतं तसं हा बिपीन न चुकता या ठिकाणी दिसतो. आणि अनेकांनी त्याच्याक़डून तिकिट घेतलेलं आहे.
लॉटरी हे दहा रूपयात मिळणारं दहा लाखांचं स्वप्न असतं आणि हे विकणारा बिपीन त्यामुळेच मला सपनोंका सौदागर भासतो..त्यातही मला आश्चर्य वाटतं ते अनेकांना स्वप्न दाखवणारा हा बिपीन स्वतः मात्र काहीच बघू शकत नाही. अंध असून आयुष्याचं आव्हान त्यानं सकारात्मक मनानं स्वीकारलय हे नक्कीच कौतुकास पात्र आहे. बिकट परिस्थितीत आयुष्य काढणा-या हा बिपीनकडे बघितल्यावर छोट्या कारणांसाठी आयुष्याचा राजीनामा देत आत्महत्त्या करणा-यांची किव आल्याशिवाय राहत नाही.
आयुष्य साधं सोपं आणि सरळसोट येतच नाही. संघर्ष.. दुःख...वेदना.. आनंद. हा भावनांचा पसारा हा सोबत येत असतो. हा सारा पसारा न नाकारता आला क्षण जगणं आणि त्यात आयुष्य शोधणं ज्याला सहज जमतं त्याला आयुष्यात कमी त्रास होत असतो. आपण आयुष्यात किती सकारात्मक विचार करतो आणि किती जणांना सकारात्मक ऊर्जा देतो हा विचार आपण करायला हवा.
काय चालू आहे असं विचारल्यावर ... काय वैताग आहे किंवा काय त्रास आहे अशी प्रतिक्रिया देणारे आसपास किती आहेत हा विचार आपण कधी केला आहे का... मी मजेत आहे असं बोलत स्मितहास्यानं बोलण्याची सुरूवात करणारे किती आहेत हे देखील आठवून पहा..सकारात्मक बोलणारी व्यक्ती त्याच पद्धतीची ऊर्जा इतरांना देत असते. बिपीनकडे बघितल्यावर अशीच ऊर्जा मलाही मिळते.
अंध असल्याने त्याला स्वप्न दिसतात की नाही हे माहिती नाही मात्र दहा रूपयात दहा लाखांचं स्वप्न तो विकतो... आपण काय घेतो... शेवटी माझ्यासाठी त्याचा तो सकारात्मक ऊर्जेचा स्रोत महत्वाचा आहे. म्हणूनच गुलमंडीवर गेल्यावर बिपीन कडून एक तरी तिकीट घेणे हा माझा अनेक वर्षापासूनचा उपक्रम राहिलेला आहे...
क्या बेचा उसने ये ना सोचों यारों..
क्या आपने पाया यह जरूरी है...
जिंदगी सिखाता है ये बंदा हमें..
भूल कर अपनी सारी मजबुरी है..
आँख पर है पर्दा, पर नही वो अंधा..
यारो.. अपनी आँख खोलना जरुरी है

प्रशांत दैठणकर      १५ सप्टें.-११

Saturday 10 September 2011

व्यक्त किती..?... अव्यक्त


आज आयुष्यात काय हवे आपणाला असा सवाल आपण रोज मनाला विचारावा असे वाटते. कारण याचं तंत्र रोज बदलताना दिसते. काही काळापूर्वी आपण काय होतो आणि आज काय आहोत याचाही आपण आढावा घेतला पाहिजे. काळ झपाट्याने बदलत आहे आणि त्याची ही गती कायमच राहणार आहे यात शंका नाही. श्रीकृष्णाने संदेश दिला.. परीवर्तन ही संसार का नियम है.. आपण वाचतो... कळतं.. पण वळत नाही..
     
सारी आशा सारी स्वप्ने..
      एका छोट्याशा मनातली
      कुणी मला का गावे..
      का मी कुणा सांगावे..

      का घडते हे सारे समजे ना
      भाव मनाची काही उमजेना
      आज धावताना या जगात
      मन मात्र धावे आकाशात

      आशेचा हा लांबलेला दोर
      त्याला कारूण्याची किनार
      का मी आहे या जगात..
      प्रश्न रोज नव्याने मनात
     
      तिचा तो रोजचा त्रागा
      वैतागाची नशिबी जागा
      राग हा सरता सरेना..
      मन उदास.. भरता भरेना
     
      शब्दांचे शर कधी हो झाले
      नजरेतही काटे मग आले
      तीर फेकायाला नाही धीर
      अन् झेलाया हा माझा ऊर
     
      का म्हणूनी उशिर हा झाला
      नवा प्रश्न अधिर या मनाला
      आता कुठले जीव   न..गाणे ?
            उठता मैफल.. रूसले तराणे..
     
      आणि आयुष्याच्या हा न कळलेला प्रवास असाच चालू ठेवावा म्हणत किती जण चालत असतात आणि किती जण नेमकपणाने जगत असतात.. आकडा दाखवता येईल.. प्रगतीचं भौतिक मापही मांडता येईल..आतल्या जखमा किती जणांना मांडता येतात.. शब्दात घेऊन भावना मोकळेपणानं किती जणांना सांडता येतात.. असे हे जीव मग पुस्तकात आपली प्रतिमा शोधत त्या प्रतिमेच्या आड आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून देतात..
     


      व्यक्त किती..?... अव्यक्त..
      मनाची सारी ही आसक्ती
      मनच या सा-या चिंतेचे कारण..
      कारण किती..? ..  विनाकारण

      चालत राहतात ध्येय्य मानून नसण-या बाबींना आणि आयुष्याच्या एखाद्या वळणावर जाणवत अरे जगायचच राहून गेलं.. जरी त्या जगाला वाटत असतं की काय मस्त जगलाय हा... हा मात्र आतून कोराच असतो.. पेन्सीलने लिहून कुणी पाटीवरली अक्षरे मिटवावीत तसं याची पाटी कोरीच असते..
                        याची पाटी कोरीच असते..!
याची पाटी कोरीच असते..!
           
PRASHANT    10.09.11    SATURDAY

Tuesday 6 September 2011

हजरजबाबी किरण

काही मित्र आठवत राहतात आणि काही मात्र आठवत नाहीत असं कधी होतं का .. हो कधी कधी असही होत असतं. काळ असं याला उत्तर आहे. काही जण मात्र आयुष्यभरासाठी सोबत चालत राहतात. जरी आज ते ग्रुप सोबत नाहीत. त्यांच्या व्यावसायिक आवश्यकतेनुसार ते अलग झाले तरी ते आजही सोबत असतात अगदी काल सोबत होते तसेच. अचानक फोनची घंटी वाजते आणि त्याचा फोन असतो अरे मी आलोय.. असाच एक मित्र किरण...
     किरण . आज हो आज त्याला सारं जग वेगळ्या नावानं आदबीनं ओळखतं .. मात्र शाळेपासून अगदी काही काळ आधीपर्यंत तो आमच्या ग्रुपचा जीव होता. आज त्याला या सा-यासाठी वेळ नाही, हे त्याला जितकं मिस होतं त्यापेक्षाही आम्हाला अधिक मिस होतं हे मात्र कबूल करावं लागेल.
     निरपेक्ष प्रेम करणारे जे थोडे आसपास आहेत त्यापैकी किरण हा माझा एक मित्र. मैत्री नेमकी कशी सुरू झाली याचे संदर्भ आज आठवत नाहीत इतका काळ आम्ही सोबत आहोत. पाचव्या वर्गात सरस्वती भूवनला प्रवेश घेतला आणि अनेक नव्या मित्रांशी एकदम ओळख झाली.. यातील ओळख ते मैत्री हा प्रवास पूर्ण करणा-या मोजक्या काही जणांपैकी किरण हा एक. किरण म्हणजे काय असं कुणी विचारलं तर त्याचं उत्तर आमच्या ग्रुपमध्ये एकच येईल... किरण म्हणजे हजरजबाबीपणा...
     दुपारी शाळेतून आल्यावर आमचा मित्र नितीनच्या घरी सारे जमायचे. त्याचे आई आणि वडील ( नाना ) हे दोघेही नोकरीला होते. त्यामुळे दुपारी घरी कोणी नसे. आमचा कंपु इथं धिंगाणा घालायला हजर असायचा. नितीन ज्या ठिकाणी रहायचा त्या गौरक्षण वाड्यात क्रिकेट खेळायला जागा देखील मोठी होती. दुपारी खेळायला जाण्यापूर्वी नितीनने लोकसत्ता वाचायला घेतला होता. वाचताना त्याने राशीभविष्य वाचू म्हणत मोठ्याने राशीसह दिवसाचे भविष्य सांगायला प्रारंभ केला. आता राशी भविष्य हा सा-यांचा आवडता कार्यक्रम. किरणची रास आल्यावर त्यात लिहीले होते... हौसेवर नियंत्रण ठेवा... हे वाक्य नितीनने वाचले न वाचले.. त्याच्या वाक्याला जोडून किरणची कॉमेंट होती... आता ही हौसा कोण..?.. हा या आमच्या मित्राचा हजरजबाबीपणा..
     असा हा किरण आणि आमचे शाळा महाविद्यालयाचे दिवस यात खुप आठवणींचे नाते आहे. गणित आणि इंग्रजी या विषयांनी बांधावरून भांडण असावे आणि संधी मिळताच त्याचा वचपा काढावा तसा काहीसा दुष्मनी काढण्याचा प्रकार कायम किरणसोबत केला..आणि त्याला आमच्या सोबत दहावी परीक्षा देउनही प्रथम वर्षात प्रवेश घ्यायला दोन वर्षे विलंब झाला.. मात्र हा गडी खंबीर.. आजकाल नापासाच्या भितीनं आत्महत्त्या करणारे बघितले की किरणचं खरच कौतुक वाटतं... पराभव झाला तर तो पचवता आला पाहिजे हे त्याच्याकडे बघून सा-यांनीच शिकावं.
प्रथम वर्षाला प्रवेश घेताना झेरॉक्सचा गठ्ठा खूप मोठा झाला. त्याला पीन लावूनही कागदं एकत्र राहत नव्हते.. त्याला छेडायचं म्हणून सहज म्हणालो... अरे याला चांभाराकडून शिवून आणावं लागेल... अन् कोणताही किंतु न बाळगता स्वारी निघाली.. चपलेला देतात तसे टाके लावून कागदं चक्क शिवून आणली होती... असा हा निर्मळ मनाचा किरण.. पुढली तीन वर्षे कोणतीही एटीकेटी न घेता क्लिअर झाला हे विशेष..
१९८६ साली कयामत से कयामत तक नावाचा हिट सिनेमा आला त्यात एका पात्राचे नाव दुरा होते... झालं आमच्या या मित्राचं नामकरण.. आजही कंपुतलं नाव दुरा हेच आहे..
     एखाद्याचा स्वभाव किती मिश्कील असू शकतो याला आमच्या कंपुत उत्तर किरणपेक्षा जादा नाही असं आहे. हा पठ्ठ्या एकदा जालना रोडवरून गुलमंडीकडे येत होता. पावसाळ्याचे दिवस. हा स्कुटरवर, समोर एक सायकलवाला.. सायकलला मडफ्लॅप नव्हते.. झालं सारा चिखलाचा फवारा किरणच्या अंगावर... आपण या जागी असता तर  काय केलं असतं... भांडणच केलं असतं ना.... किरणने त्या सायकलवाल्याला जोरात आवाज देउन थांबविला.. सहाजिक तो सायकलवाला घाबरलेला... किरणने खाली उतरून त्याच्याकडे जायला सुरूवात केली तसा तो अधिकच घाबरला... किरणनं काय करावं.... खिशात हात टाकून दहा रूपयांची नोट काढली ती नोट त्या सायकलवाल्याच्या खिशात कोंबून त्याला शांतपणे सांगितले... मडफ्लॅप लावून घे... रस्त्यावर हा सिन बघणारे सारे हा प्रकार पाहून सर्द झाले.. असा हा किरण..
      आपल्या आसपासच्या कंपुतही एखादा असा किरण नक्की असणार.. आमच्या कंपूला हा किरण ऊर्फ दुरा त्यासाठीच प्यारा आहे...
-प्रशांत दैठणकर

Sunday 4 September 2011

मागे कधी वळून शेवटचं बघितलं आपण.

चालता चालता  ठेच लागता येई आठवण..
मागे कधी वळून शेवटचं बघितलं आपण..
प्रवाह होवून प्रवाहीत रहायचं म्हणूनच हे..
सततचं ठेचकाळत चालत राहणं...
चालायचच असं..प्रवास. होतच असतात या
जखमा म्हणत खाली देखील न बघणं..
कधी आलाच थकवा तर बघायचं तिच्याकडे..
मी थकलो तरी न थकणारी माझी ती सावली..

आयुष्य असच शिकलोय मी प्रत्येकापासून..
त्याचा तो बरसायचं कधी विसरत नाही पाऊस..
आपणच का मग बहाणे शोधायचे.. एक विचार..
खरच का तिला...असते सरितेला ओढ सागराची.
प्रवाह थांबला तर डोह.. जीवन.. ब्रेक के बाद..
ती नव्याने मार्ग शोधते... नवी वाट सागराची..
ती देखील शिकवतेय मला जगायला..
असेल तिला.. मला कुठे वेळ एक ब्रेक घ्यायला..

चालत चालत दूरचा आला तो अनोळखी देश..
इथं ना आसरा.. ना कुणी ओळखीचा चेहरा..
क्षणभर.. आज मागे वळुनी बघता..
अल्बममध्ये होत्या त्याच तसबीरी. रंग तेच...
आयुष्यातून मात्र माणसं अलगद उडून गेली..
त्यांच्यासवे त्यांची सारी.. स्वप्ने विरुन गेली..
आठव काढत नाही थांबत काळ कुणासाठी..
तो ही एक गुरू मानला.. पुन्हा चालण्यासाठी..

मनापासूनी जो मी जाणला अन् पाहीला..
त्या प्रत्यकाशी आजवरी गुरुच मानला..
का कुणी प्राणी पट्टी बाधंतो जखमांवरी..
मग माणसा इतके कौतुक का स्वतःचे करी..
त्या निसर्गालाही मान गुरुचा.. मनापासूनी..
आपणही चालावे..क्षितीजापर्यंत क्षितीजापासूनी
दर दिवशी येणा-या रवीला गुरु समजुनी...

स्वप्ने बघावी.. स्वप्ने जगावी.. प्रीत मानूनी..
प्रित ही आखिर एक स्वप्नच असते...
त्या प्रितीचा एकच धागा...शिकवी जीवन..
प्रित ही न्यारी... भरती जखमा आठवणींनी..
सारेच सारे पुन्हा सांगती.. चल रे मित्रा...
चालत रहा.. थकली सावली तरच पहा...

पुन्हा वळुनी बघतो माझीच मी सावली..
तिलाच घाई.. धावत्या दिवसासंगे ती..
अधिकच धावत जाई.. मीच थांवलो..
उगा क्षणभरी... आयुष्य थांबत नाही.....
चालता चालता  ठेच लागता येई आठवण..
मागे कधी वळून शेवटचं बघितलं आपण..

प्रशांत दैठणकर

व्हर्च्यूअल रियालिटीचा जमाना



आजकालच्या मुलांना फेसबूक हे नवं करमणुकीचं साधन मिळालं आहे. आणि या नव्या छंदानं मुलं काही प्रमाणात वास्तवापासून दूर जात आहेत हे देखील तितकच खरं आहे हे आपण कबूल करायलाच हवं.. इथं सारं कसं गुडी गुडी असल्यानं आपला इगो सुखावला जात असल्याने सारे याच्या मागे आहेत हे वास्तव देखील आपल्याला विसरता येणार नाही.
कोण कुठला ओळखीत नसणारा आपल्या संपर्कात येतो आणि आपल्या भाव विश्वाचा एक भाग होतो. भावना व्यक्त होतात आणि त्याचे कौतूक होतं इथवर ठिक आहे मात्र यात किती प्रामाणिकपणा आहे याला तपासण्याचं ज्ञान मुलांना मिळत नाही हे पालक या नात्यानं मला सातत्यानं वाटत रहातं
व्हर्च्यूअल रियालिटीचा हा जमाना आहे. हा जमाना असा असला तरी भावना मात्र ख-या आहेत हे आपण ध्यानी ठेवायला हवं. आपण एखादा गेम संगणकावर खेळतो त्यावेळी आपणास मिळणारा जिंकण्याचा आनंद हा निश्चितपणे खरा असतो. हा आनंद वारंवार मिळावावा असं वाटतं. आपण ज्यात अधिक आनंद मिळवतो तो गेमच आपल्याला आवडतो. आपणास व्हर्च्यूअल रियालिटीच्या जगात आपल्या मतानं आणि आपल्या मनानं जगण्याचं स्वातंत्र्य असतं... वास्तवात पडेल ते दान स्वीकारावं लागतं... कायम महाभारतातल्या शकुनीमामा सारखं हक्कानं पौ-बारा दान देणारे फासे आपणाकडे असत नाहीत... हा फिल ही व्हर्च्यूअल रियालिटी आणत आहे... हा खूप मोठा धोका आहे हे आपण जाणलं पाहिजे..
व्हर्च्यूअल रियालिटीचा अतिरेक होतो त्यावेळी इगो देखील वेगळ्या पद्धतीनं काम करायला लागतो..... त्याचे फेसबूकवर हजारांहून अधिक मित्र आहेत आणि आपले फक्त तिनशे.... ही भावना आजच्या पिढीला कोणत्या वळणावर सोडणार आहे ते कळत नाही.. आहेत ते मित्र आपल्या या नव्या व्हर्च्यूअल रियालिटीच्या जगात तरी किती साथ देत आहेत हा विचार आपण करायला हवा असं मला वाटतं..
नाही म्हणायला हा व्हर्च्यूअल रियालिटीचा जमाना जुन्या आठवणींना उजाळा देत असतो आणि काळाच्या ओघात दूर देशी गेलेल्यांना जवळ आणतो हे देखील विसरता येणार नाही.. जमा कमी आणि बाकी जादा... नेमकं काय साधतो आपण इथं यावर क्षणभर विचार करायलाच हवा ना मित्रांनो..
व्हर्च्यूअल रियालिटीचा जमाना नाकारता येणारच नाही हे खरं असलं तरी आपण व्हर्च्यूअल रियालिटी मध्ये किती आणि रियालिटीत किती जगायचं याची जाणीवच नसणा-या आपल्या नव्या पिढीला यातलं अंतर शिकवायला पाहिजे... हे अंतर त्यांच्या अंतरंगावर कायमस्वरूपी परिणाम करणारं आहे..हा व्हर्च्यूअल रियालिटीचा बुडबुडा उमलती आयुष्य पार संपवू शकतो याचीही जाण आपण ठेवावी लागेल... हा काळ बदलत आहे.. परिवर्तन ही संसार का नियम है ... भगवद् गीता सांगते... पण परिवर्तन at what cost… याचा विचार आपणच करा... जिंदगी है आपकी... चाहे वो रियालिटी हो या व्हर्च्यूअल रियालिटी....
प्रशांत दैठणकर