Thursday 30 June 2011

मस्तानी... माझ्या बालपणातली !

dpacific@hotmail.com
                                                                दि.30 जून 2011

      मस्तानी...बाजीरावची नाही तर बालपणाची एक आठवण. मी घरी दूध मिळतं म्हणून शिवूरकर वकीलांच्या घरी रोज सायंकाळी दूध आणायला जायचो. औरंगाबादेत आल्यावर वडीलांनी घरालगत असलेल्या नगरपालिकेच्या शाळेत नाव टाकलेलं. त्यांच आडनाव जोशी पण गावाची आठवण म्हणून माझं आडनाव दैठणकर टाकलं आणि घराण्यात पहिला दैठणकर जन्मला. शाळेत वर्गात पहिला क्रमांक यायचा. माझी बोलण्याची पध्दत बघून शिवूरकर वकीलांच्या पत्नी ज्या स.भू. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्यांनी माझं नाव चौथ्या वर्गात स.भू.शाळेत घालायला लावलं.
      सरस्वती भूवन शिक्षण संस्थेचा तो परिसर ज्याला सारे एसबी नावाने नावाजलं आहे. नंतर पदवी उत्तीर्ण होईपर्यंत जीवनाचं एक अंग बनला. त्या परिसरात शिरताना रस्त्यावर ही मस्ताना कुल्फी. ज्याला आम्ही मस्तानी म्हणायचो कुल्फीवाला सिंधी मात्र अस्खलीत मराठी बोलायचा.
      आता मुलांना पैसा माझ्या नाणेसंग्रहात दाखवतो त्यावेळी मात्र तो चलनात होता 5 पैशाची कुल्फी आठवडयात ज्यावेळी हाती पैसे येतील त्यावेळी हक्काची. आईने सकाळी दिलेले पैसे त्या हाफ चड्डीच्या खिशात ठेवल्यानंतर मध्यांतरापर्यंत ते हरवणार नाहीत याची काळजी करत सारखा हात खिशाला लावणं म्हणजे मंदीरात दर्शनाला गेल्यावर चपलांवर लक्ष ठेवण्यासारखं असायचं.
      मध्यांतराची घंटा वाजताच धावत कुल्फीची गाडी गाठायची मोठया आनंदानं त्या सिंधी कुल्फीवाल्यास 'एक कुल्फी देना' सांगायचं त्याच्या गाडीवरच्या त्या आसमानी रंगाच्या पेटीतून तो कुल्फीचा ऑल्यूमिनियमचा साचा काढायचा कुल्फी ढिली होण्यासाठी शेजारच्या पाण्याच्या बुधल्यात बुडवून जादू करावी तशी तो कुल्फी काढून हातात द्यायचा. स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे आणि तितकेच शुभ्र पांढरे केस असा त्याचा वेष आणि त्याच्या गाडीचा तो आसमानी रंग आधी शाळा नंतर कॉलेज असा साधारण 12 वर्षाचा काळ स.भू च्या परिसरात घालवला तो संपूर्ण काळ मस्तानीत आणि तिच्या चवीत बदल झाला नाही.
      काळानुसार आवडी बदलल्या आणि सवंगडी येत राहिले आणि बदलत राहिले नंतर चहा आणि वडा पावचा चस्का लागला. गुलमंडीवर रहायला गेलो त्यावेळी मागच्या जोहरीवाडयात तो कुल्फीवाला रहातो हे कळलं. तो रोज सकाळी गाडी घेऊन निघालेला दिसायचा. एक दिवस त्याची मस्तानी कायमची दुरावली.
      आठवणींचा गलका वाढत जातो. त्या शाळेच्या किलबिलाटात कुल्फी अशी त्याची आरोळी आणि 5 पैशांची कुल्फी मात्र आजही जिभेला पाणी आणते.
                                                 -प्रशांत दैठणकर                                          


Wednesday 29 June 2011

पाऊस...मना मनातला, पाना पानातला !

पावसाळा आणि गाणी तसंच पाऊस आणि पक्षी अशी आगळी दुनिया आपण आपल्या आसपास घेऊन जगत असतो. त्याच्याशी संबंधित अनेक म्हणी देखील आहेत आणि पावसाशी निगडीत खूप साहित्य आहे. अन्‍ पाडणा-या प्रत्येक सरीसोबत यात नव नवी भर पडतच असते.
मी तुझ्यापेक्षा जास्त काळ पाहिला आहे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे असं सांगण्यासाठी 'मी चार पावसाळे जास्त पाहिलेत' असं म्हणण्याचा प्रघात आहे व्यक्तीच्या बडबडया स्वभावाबाबत आणि कृतीशुन्यतेबाबत 'गर्जेल ते पडेल का' ? किंवा 'गरजणारे ढग बरसत नाहीत' असा वाक्‍प्रचार आहे.
उन्हांनं काहिली झाल्यावर पावसाचे वेध सगळयांना लागतात. अशा वेळी पावसाची आतुरता दर्शविण्यासाठी 'चातकासारखी वाट बघतोय पावसाची' असा एक वाक्‍प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. चातक किंवा पावश्या नावाचा हा पक्षी पावसाच्या आगमनाचा सूचक आहे. असाच दूसरा पक्षी अर्थात आपला राष्ट्रीय पक्षी मोर होय. पावसाच्या सरी सोबत मोर आपला सुंदर पिसारा नाचवून नृत्य करतो. या नृत्याची वर्णनं अनेक काव्यातून आहे.
पाऊस जसा कवितांचा तसाच तो मेघदूत सारख्या महाकाव्याचा देखील आहे. महाकविच्या विरहाचं काव्य असा उल्लेख कालीदासांच्या मेघदूत बाबत करता येईल. मेघांना माध्यम बनवून प्रितीचा दिलेला संदेश याच पावसाचं एक रुप आहे असच म्हणता येईल.
पावसाची गाणी अनेक आहेत. श्रावणात बरसलेला निळा घन अर्थात 'श्रावणात घन निळा बरसला' हे गाणं असो की 'नभ उतरु आलं, अंग झिम्माड झालं' हे गाण शब्द आणि सुरांनी चिंब भिजलेल्या निसर्गाचं चित्र यामुळे उभ राहतं.
पावसाचा दृष्टांत वापरुन अनेक गाणी आकारास आली आहेत़, मेहबुबा चित्रपटसाठी लता मंगेशकर आणि किशेरकुमार यांनी वेगवेगळं गायलेलं गीत 'मेरे नयना सावन-भादो फिरभी मेरा मन प्यासा' पावसाची प्रतिमा यात नायक आणि नायिकेच्या भावना व्यक्त करण्यासाठी चपखलपणाने वापरली आहे.
लहानपणी पाऊस तुम्ही बघितला तो 'ये रे येरे पावसा, तुला देतो पैसा असं म्हणत. आता काळया पैशांवरुन देशात मोठी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर पावसाला पैसा का द्यावा लागतो? या नव्या प्रश्नानं जन्म घेतलाय जसं काही पैसा दिला नाही तर पाऊस पडणारच नाही असं काही आहे का? आणि हो त्याला द्यायला पैसा आहे कुठ, कारण पैसा चलनातूनच हद्दपार झालाय आता फक्त उरलाय तो बंदा रुपया.
ज्याचं घरदार पावसावर अवलंबून आहे तो बळीराजा तुम्हाला-आम्हाला पाऊस फक्त भिजायला आणि एन्जॉय करायला हवा असतो परंतु त्याला पोटापाण्यासाठी पावसाशिवाय पर्याय नसतो. त्याच्या अधीरतेत तेव्हा अधिकच भर पडते जेंव्हा पाऊस ताण देतो. त्याची ही अधीरतेची भावना 'पड रं पाण्या रं पाण्या,कर पानी, पानी .... चातकावानी' या गाण्यात व्यक्त होते. त्यातला आर्त टिपेचा सूर आपल्याही ती शेतक-याची वेदना जगायला लावतो.
लग्न करुन सासरच्या घरी राहणा-या मैत्रीणी काही काळ माहेरपणासाठी येतात आणि त्यांचा तिथला रहिवास संपल्यावर परतीचा दिवस आणि त्यात पावसाचं येणं 'आला आला वारा, संगे पावसाच्या धारा' या गाण्यात माहेर सोडण्याचं दु:ख आणि नव-याच्या संगतीनं राहण्याची नव्याने लागलेली ओढ त्यातला तो रोमांस उभा करण्यात या गाण्यात पावसाचाच वापर झालय.
पावसाचं एक वेगळं असं वर्णन यश चोप्रा कॅम्पच्या चित्रपटातील एका गाण्यात आहे. पाऊस नेमका कसा याचं हे वर्णन अप्रतिमच आहे 'घोडे जैसी चाल, हाथी जैसी दूम, ओ सावन राजा कहॉसे आये तूम' त्या पावसाचा पसारा आणि गतीचं हे वर्णन 'कोई लडकी है, जब वो हसती है, बारीश होती है घुमड घुमड घुम-घुम' त्या तिच्या हास्यानं आनंदीत पाऊस अगदी मनसोक्त बरसतो त्यासाठी ही उत्तम शब्द योजना म्हणावी लागेल.
पावसात येणा-या निरनिराळया आवाजांना शब्दात बांधलं तर त्या शब्दांसोबत पाऊसही आपल्या मनात पडतो आणि डोळे मिटले तर चित्र समोर उभं राहतं असं ताकदीनं शब्दात पाऊस शब्दात पकडलाय तो छै छप छै छपाक छै या गाण्यात आपणच पाण्यात उडया मारतोय असं चित्र उभं करणारं हे गाणं.
असा हा पाऊस लिहिला तेवढा पडत जाणार आणि त्याला गोडवा वाढत जाणार म्हणूनच सहजपणे ओळी सूचतात
पाऊस... थेंब, थेंब, ओला चिंब
पाऊस... तुफानी, वेडयासारखं पडलेला
पाऊस... कधी पडायचंच विसरलेला
पाऊस... कांद्याची भजी अन् कॉफीचा मग
पाऊस... बाल्कनीत छतावरुन हातावर नाचलेला
पाऊस... अंगणातले ओहोळ... कागदाच्या होडया
पाऊस... मना मनातला... पानापानातला
पाऊस... अडलेला... ढगात घुसून पाडलेला
पाऊस... बालपणीचा... दंगा मस्तीचा
पाऊस... तारुण्याचा कधी कारुण्याचा
पाऊस... सखा... तोरणापासून मरणापर्यतचा
पाऊस... कवितेचा... प्रेम गीतांचा
पाऊस... आग्रहाचा... कधी कधी विरहाचा
पाऊस... एक प्रित जीवनाचं गीत
पाऊस... ताल, नाद, लय... परिपूर्ण संगीत
पाऊस... एक आठवण... आठवणींचा साठवण
पाऊस... दुख-या मनाला दिलेली उसवण
पाऊस... बिलगणारा, उगाच सलगी करणारा
पाऊस... तुझ्या-माझ्या, कधी तो तुझाच
प्रशांत दैठणकर

Tuesday 28 June 2011

ऑनलाईन शॉपिंग करताना... !

आपण इंटरनेट वापरता का? याला अनेकजण हो असं उत्तर देतील आपण ऑनलाईन खरेदी विक्री साठी क्रेडीट किंवा डेबीट कार्ड वापरता का? हा त्यापुढील सवाल आहे. याचं उत्तर हो असं सकारात्मक आल्यास लगेच पुढील सवाल येतो की आपण सुरक्षित आहात का? हा प्रश्नांचा भडीमार यासाठी की इंटरनेटवर आर्थिक व्यवहार करताना खबरदारी बाळगली नाही तर आपणाला खूप मोठे नुकसान होवू शकते.

साधारपणे बाजारपेठेचा विचार केल्यास गेल्या 4 दशकात विक्रीची पध्दत सातत्याने बदलताना आपणास दिसेल यात दुकानातून विक्रीची पध्दत आहे. वस्तू दुकानात विक्रीसाठी ठेवायच्या आणि ग्राहकांनी त्या दुकानात जाऊन खरेदी करायच्या असा प्रकार होता हा पारंपरिक प्रकार आजही सुरु असला तरी नव्या पध्दती यात आल्या आहेत.

पारंपरिक पध्दतीत वस्तु सुस्थितीत आहे की नाही याची प्रत्यक्ष खात्री शक्य असते आणि विक्रेता देखील आपल्या परिचयाचा असतो यानंतर आलेली पध्दत अर्थात थेट विक्री (Direct Marketing) आपल्या घरी येवून वस्तू विकणारे सेल्समन आपण अनेक बघतो. यात त्या सेल्समनचा परिचय नसला तरी वस्तू पारखुन आपण घेऊ शकतो. मात्र तो विक्रेता निघून गेल्यानंतर आपल्याला त्यात काही बदल करता येत नाही.

नंतरच्या काळात आलेला प्रकार अर्थात टेलेमार्केटींगचा टिव्हीवर जाहिरात दाखवून फोनवर खरेदीची मागणी नोंदविण्याचा, यात आता वृत्तपत्रात देखील जाहिराती रोज दिसतात. इथं आपणाला क्रेडीट कार्डव्दारे खरेदी करता येते त्याच प्रमाणे आपण वस्तू घरी पोहचल्यावर अर्थात कॅश ऑन डिलीव्हरीचा पर्याय देखील निवडू शकतो यात उत्पादक कंपन्या 14 दिवसात वस्तू पसंद न पडल्यास परत घेण्याचे आश्वासन देतात इथंही खरेदी करताना आपण योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक असतं

यापुढचं पाऊल अर्थात इंटरनेटचं या महाजालात आपणात वस्तूंची विक्री करणा-या अनेक संकेतस्थळांना भेट देवून वस्तूच्या वर्णनावरुन खरेदी करता येते मात्र यात विश्वासार्हता कमी आहे. आपण आपल्या बँकेची तसेच क्रेडीट व डेबीट कार्डची माहिती देताना पूर्ण माहिती घेऊन व सुरक्षिततेची खबरदारी बाळगूनच व्यवहार करावा ही माहिती पळवून आपल्या खात्यातला सारा पैसा गिळंकृत करणारे अनेक हॅकर्स फक्त माहितीच्या या दुव्याचीच वाट बघत असतात.

नेटबँकींग करताना तसेच ऑनलाईन खरेदी करतांना केवळ एकच विंडो खुली आहे याची खात्री करा आपल्या संगणकाला अॅन्टीव्हायरस असेल तरच खरेदी करा नसता या फंदात पडू नका.

अनेक सुरक्षित साईटस्‍ इथं आहेत त्या साईटस्‍ आपणास 'व्हर्च्युअल की बोर्ड' स्क्रीनवर उपलब्ध करुन देतात त्यामुळे माहिती चोरली जाण्याचा धोका नसतो. काही बँकांनी आता खास मर्यादीत रकमेची क्रेडीट व डेबीट कार्डस्‍ जारी करायला सुरुवात केली आहे. त्यावरील ती रक्कम संपताच कार्ड रद्द होते अशा कार्डांमुळे धोका कमी होतो. तसेच ऑक्सीकॅश सारखी रिचार्ज आणि प्रिपेड कार्डस देखील बाजारात उपलब्ध आहेत त्यांच्या वापरानेही सुरक्षित खरेदी करता येते.

सुरक्षेची काळजी घ्या आणि ऑनलाईन खरेदी करा असं सर्वांनी लक्षात ठेवावं

-प्रशांत दैठणकर

डबाबंद अन्न वापरताना सावधान... !

जीवनात होणारे बदल हे अपरिहार्य आहेत मात्र या बदलांमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम कसे होतात याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागते. धकाधकीच्या या जगण्यामुळे आता रेडी टू इट अर्थात पॅक फुडचा जमाना आला आहे. हे डबाबंद पदार्थ म्हणजे गृहिणींची खूप मोठी सोय असते डबा उघडला गॅसवर अन्न गरम केलं की जेवण तयार.

या डबाबंद अन्नामुळे आरोग्याची मात्र हानी होवू शकते. यात श्रम आणि वेळेची मोठया प्रमाणावर बचत होते हे मान्य केलं तरी त्यासाठी आपण काय मोल देतो याकडेही लक्ष देणं गरजेचं ठरतं एखादवेळी अशा अन्नाचा वापर समजण्यासारखा आहे मात्र घरात पाकिटे आणून ठेवलेली असल्याने त्याचा वापर देखील तितकाच अधिक प्रमाणात वाढतो.

मुलं टिव्ही बघताना काही ना काही खतात याचा परिणाम स्थुलपणा वाढण्याकडे होते तसेच काही मोठे आजाराही या माध्यमातून कायमचे पाहुणे म्हणून आपल्या शरीरीत दाखल होतात. डबा बंद आणि पाकिटबंद अन्नात मॅगी, पास्ता यासोबत आता भाज्या यायला लागल्या आहेत.

या प्रकारचे रेडी टू इट अन्न आप4ल्याला मधुमेह, रक्तदाब, अल्सर, गॅसेस, स्थुलता आदी विकार देवू शकतात यातील चायनीज पदार्थात अजिनामोटो नावाच घटक असतो. त्याचे सेवन नियमितपणे करणे धोकादायकच आहे. अन्न जादा काळ टिकावे यासाठी अशा पदार्थामध्ये मोठया प्रमाणावर प्रिझर्व्हेटीव तसेच रंगांचा वापर होतो यात व्हिनेगर देखील असते. कृत्रिम रंग आरोग्यास हानी पोहचवतात हे सर्वांनाच ज्ञात आहे.

अधून-मधून अगदीच अपरिहार्य स्थितीत असे पदार्थ खायला हरकत नाही पण त्यासाठी आपण खरेदी करतान त्या डब्यांवर दिलेल्या सुचना व माहिती वाचावी वस्तूचं उत्पादन आणि वापरण्याची मर्यादा अर्थात एक्स्पायरी डेट यादींची माहिती करुन घ्यावी ही माहिती पूर्णपणाने घेतल्याशिवाय पदार्थ खरेदी करुच नयेत.

अशा प्रकारचे अन्नपदार्थ बनवायचे कसे याची कृती त्या डब्यांवर दिलेली असते आपण आपल्या मनाने आणि आपल्या पध्दतीनुसार त्या विनाकरण बदल करु नये दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन करावे. ब्रेडसारखा पदार्थ उल्पकाळात खराब होतो त्याच्या वापराबाबत विशेष काळजी घ्यावी.

काळ बदलला आहे आणि काही बदल हे स्वीकारावेच लागतात अशा स्थितीत आपण आरोग्याचा विचार प्रथम करावा जेणेकरुन नंतर आजारावर पैसे आणि वेळ खर्च करावा लागणार नाहीत.

Monday 27 June 2011

मेरा लाखोंका सावन.....


पाऊस म्हटलं की तो आभाळातूनच पडतो असं नाही भाव भावनांचा पाऊस डोळयांमधून पडतो आणि त्याचाच शब्दबध्द पाऊस म्हणजे भीज गाणी पावसांचंआगमन होताच ही गाणी पुन्हा पटलावर येतात प्रत्येक गाण गजरेसमोर एक वेगळं चित्र उभं करतं अशा काही गाण्याबाबत थोडसं.

-प्रशांत दैठणकर

पावसाचं आगमन होताच निसर्गाला आणि मनाला उभारी येते वैशाख वणव्यात झालेली होरपळ विसरुन सारे जण नव्यानं आयुष्याचा अंकुर येण्याची वाट बघायला लागतात शेतकरी विशेष करुन आपल्याकडे याची वाट बघतो असं म्हटलं तरी प्रत्येक सजीवाला या मेघाच्या बरसण्याची वाट असते.

पाऊस म्हटल की थेंब थेंब आयुष्य त्या प्रत्येक थेंबात भावभावना आणि आशेचा पूर पावसासोबतच प्रेम जीव साद घालतात त्या प्रेमाच्या पावसाळी कविता आणि प्रेमावरील पावसाळी गाणी हिंदी चित्रपट सृष्टी असो की मरीठी दोन्हीमध्ये अशी पावसाळी गाणी आणि त्याची परंपरा आहे.

श्रावणात घननिळा बरसला...!

हे घनगंभीर आवाजातल पावसाचं लतादिदीनी गायलेल गाणं कोणत्याही ऋतूत आपल्या समोर त्या निळया बरसणारे घन अर्थात मेघ आणि त्यामुळे चिंब झालेला आणि हिरवाईनं लगडलेला सण उत्सवांचा श्रावण समोर आणतो.

आला आला वारा.. संगे पावसाच्या धारा

आठवणी करा सया निघाल्या सासुरा

अवखळ आणि अल्लड वयात विवाह झालेला त्या मैत्रीणी त्यांच माहेर सोडताना ते सोसाटयाच्या वा-यासह पावसानं येणं पुन्हा बालपण जाग करायला लावणं हे शब्दचिंब बोल.

हिंदी चित्रपटामधून राजकपूर, मनोजकुमार तसेच सुभाष घई, फिरोज खान यांनी चित्रपट निर्मितीत या पावसाला खास स्थान दिलेल आपल्याला दिसेल त्यात मला मनोज कुमारची गाणी अधिक चांगली वाटतात तारुण्यात प्रित रंगताना एका बाजूला ती आणि दुस-या बाजूला नोकरी यात भावना अडकून बसलेला बेरोजगार तरुण मनोज कुमारने रोटी कपडा और मकान या चित्रपटात साकारला मस्त पाऊस पडतोय आणि प्रेयसी सोबत आहे अशावेळी त्याला चिंता आहे मी नोकरीची त्याला वैतागून झीनत अमान त्याच्या नोकरीतला तुच्छपणा सांगते लता दिदींनी हे गाणं गायलय.

अरे हाय हाय ये मजबूरी

ये मौसम और ये दूरी

मुझे पल पल है तडपाये

तेरी दो टकियांदी नौकरीमे

मेरा लाखोंका सावन जायॅ

लाखेंका सावन अशी संकल्पना असणांर हे पावसाळी गाणं अशा प्रकारच्या गाण्यामध्ये अव्वल ठरणांर आहे.

जिंदगीकी ना टूटे लडी

प्यार करलें घडी दो घडी

अशा खर्जातल्या आवाजात नितीन मुकेश आणि लतादिदींच हे गाण क्रांती चित्रपटातल आहे नायक आणि नायिका दोघेही जहाजावर जखडलेल्या अवस्थेत आहेत आणि वरुन पाऊस पडतोय दुरवर नजर जाईल तिथवर, समुद्र सारं जलमय असणारं गाणं आयुष्याचा एक वेगळा अर्थ सांगतं ते या वाक्यामधून

उन आखोंका हसना भी क्या

जिन आखोंमे पानी ना हो

सुंदर अशी कविकल्पना गाण्यातल्या या ओळीत आली आहे.

मुंबई आणि कामगारांची आदोंलंन, उपोषण असा काही काळ मुंबईनं बघितलाय याच पार्श्वभूमीवरचं मनोज कुमारचं आणखी एक पावसाळी गीत म्हणजे

पानी रे पानी तेरा रंग कैसा.. !

हिंदी चित्रपटांमध्ये पावासावर गाजलेली भरपूर गाणी आहेत आर्त आवाजात -हदयातल्या भावना मोकळया करीत किशोर कुमारने आपल्या प्रेमाचं केलेल वर्णन अर्थात

मेरे नयना.. सावन भादो

फिरभी मेरा मन प्यासा

त्याच प्रकारे विरहाची किनार जपत सुरेश वाडकरांनी नायिकेविणा रहावं लागलेल्या विनोद खन्नाची प्रेममय पावसाळी विरहवेदना गायली आहे चांदनी चित्रपटातलं हे गीत आहे.

लगी आजा सावन की

फिर वो झडी है.. !

वही आग सिने में

फिर जल पडी है.. !

पावसात नायिकेची छेडछाड करणारी काही अप्रतिम गाणी आहेत त्यात किशोर कुमार यांच्या चलतीका नाम गाडी मधलं गाणं अव्वल आहे. नायक किशोर कुमार गॅरेज मेकॅनिक आणि पावसाळी रात्री बंद गाडी दुरुस्तीला आणताना भिजलेली नायिका मधुबाला हे गीत किशोर कुमारनं गायलं आहे.

फॅड त्या स्मार्ट फोनचं... !

सध्याचा काळा मोबाईलचा काळ आहे. प्रत्येकाच्या हातात या मोबाईलच्या रुपानं एक जग जसं आलय तसंच एक नवं फॅशन स्टेटमेंट समोर आलय ब्लॅक अॅड व्हाईट मोबाईल वापरणारे बी.पी.एल. तर ब्ल्यूटूथ (निलदंत), वाय-फाय, इंटरनेट सुविधा न वापरणारे लोअर मिडल क्लास त्याच्या वरील रेंजचे फोन वापरणारे मिडल क्लास आणि स्मार्टफोन आयफोन वापरणारे म्हणजे व्ही.आय.पी. अशी नवी वर्ण व्यवस्था या मोबाईलने निर्माण केलीय असं म्हणायला हरकत नाही.
हे मोबाईल वेड मर्यादेपलीकडे जाताना आपणास दिसत आहे. याचं अस्तित्व म्हणजे आपलं अस्तित्व अशी मानसिकता या यंत्राने निर्माण केली आहे. साधारण 15 वर्षांपूर्वी घरी फोन असणं म्हणजे प्रतिष्ठा होती आता सारं चित्रच बदललं आहे.
साधारण 24-25 वर्षाचा एक युवक मोबाईलवर मान वाकडी करुन बोलत गाडी चालवत होता कही दिवसांपूर्वी औरंगाबादेत घडलेला हा किस्सा आहे.रस्त्यात खड्डा आला. गाडी नियंत्रणात ठेवणे त्या मुलाला जमले नाही गाडी पडली. तो एका बाजूला मोबाईल दुस-या बाजूला पडला त्याला उचलायला धावत त्याच्यापर्यंत गेलो तोवर तो उठला होता. त्याने उठून प्रथम मोबाईल उचलला 'सॉरी यार मोबाईल गिर गया था' त्याचं बोलणं चालू याला काय म्हणणार आपण. हा प्रकार शुध्द वेडेपणा नाही तर काय.
मोबाईलच्या तंत्रातजशी प्रगती होत आहे तसं हे वेड अधिकच वाढत आहे. एसएमएस अर्थात शॉर्ट मेसेजिंग सर्व्हीस जे सध्या धुामकुळ घातलाय मोबाईल वर तासनतास चॅट करणा-या युवा पिढीनं इंग्रजी भाषा नव्या पध्दतीने लिहायला सुरुवात केली आहे. ही भाषा कधी कधी कळणं अवघड जातं इतका बदल या मोबाईलमुळे झालाय.
बॅक बेरी कंपनीने आपली सेवा देताना ई-मेलला प्राधान्य दिलं त्यामुळे त्याची गरज असणारा वर्ग त्याकडे वळतोय हे कळल्यावर आता सर्वच कंपन्यांनी आपली उत्पादने ई-मेल सुविधेसह बाजारात उतरविली नंतर आलेल्या 3 जी ने सर्वच क्रांती करुन टाकलीय काही दिवसात आणखी काही नवे बदल येवू घातले आहेत ते देखील विलक्षण असेच आहेत.
दोन दिवस जंगल भ्रमंती करताना तिथला शांतपणा अनुभवताना मोबाईल नाही म्हटलं की काही चुकल्यासारख वाटत राहतं मोबाईलचं हे वेळ येणा-या सुविधांमुळे निश्चितपणे चांगलं नाही
-प्रशांत दैठणकर
0000000