Thursday 27 July 2017

...... Happy Wala श्रावण आला !

आला आला श्रावण आला..... श्रावणाची सर्वांनाच आस असते. सण-उत्सवांची परंपरा असणा-या या देशात श्रावणाचं आगमन ही सणांची मालिका सुरु करणारा महिना आहे. श्रावणापासून सुरु झालेली ही सण उत्सवांची मालिका थेट दसरा दिवाळीपर्यंत जाणारी अशी आहे. हा श्रावण जसा सणांचा तसा कवितांचा देखील असतो.



श्रावण मासी हर्ष मानसी ..... हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे....... क्षणात फिरुन ऊन पडे


इतक्या मोजक्या शब्दात श्रावणाचा परिचय सहज होतो. श्रावण महिन्यात धरतींच रुपडं पूर्ण बदललेलं असतं. सर्व ठिकाणी आलेल्या हिरवळीने सृष्टी हिरवा शालू अंगावर घेऊन सजल्याचे चित्र आपणास दिसते.

डोंगरमाथ्यावर जमा झालेला पाऊस उतरणीला निघतो तेव्हा छोटेछोटे ओढे खळखळ करायला लागतात हे ओढे मग खाली धाव घेताना धबधब्याच्या रुपात उडी घेताना आपणास दिसतात त्यांच सूख आणि समाधान वेगळंच असतं.तृषार्थ धरतीला जशी पावसाची ओढ असते तशी ती इथल्या प्रत्येक सजिवाला असते.


स्थिरावलेल्या पाऊस आणि पेरण्यांचा काळ संपलेला अशा स्थितीत अपत्य संगोपन करावं तसं शेतकरी आपल्या शेतात मोती पिकवावे तसे पीक घेतो त्या पिकाची काळजी घेण्यात शेतकरी व्यस्त असतो.रानामधून पिकांच निंदण करताना गाणं गायचं तर काही भागात धानाची लावणी अर्थात रोवणी सुरु असलेली आपणास दिसते मात्र एव्हाना सा-या पेरण्या संपून शेतीच्या संगोपनाला श्रावणात सुरुवात होते.

आपल्या देशात कवितांचा पाऊस हा एक आगळाच प्रकार ..... या कवितांमधून पावसाच्या वर्णना ऐवजी खरोखर पाऊसच पडला तरी कधीच दुष्काळ पडायचा नाही ...... प्रत्येक जण आपापल्या पध्दतींन पावसाला शब्दात झेलायच्या प्रयत्न करताना आपणास दिसेल.काहिशी अपघातांची किनार दुदैवाने असली तरी पावसाळी पर्यटन, युवकांनी पावसाळी ट्रेक यांच्या माध्यमातून
पाऊस अंगावर घेत चिंब भिजत निसर्गाच्या बहरल्या रुपाचा आनंद घेण्याचाहा काळ , आताशा ' सेल्फी ' च्या वेडाने भारलेली तरुणाई याच 'सिझन ' ची वाट बघताना दिसते. आपापल्या नजरेतून दिसणांर निसर्गाचं सौदर्य छायाचित्रबध्द करण्याच्या हा श्रावण

महाराष्ट्रात श्रावणात दिवस निहाय घराघरात सांस्कृतिक जलसा बघायला मिळतो.गृहिणी यात अग्रेसर नवविवाहित तरुणीपासून सर्वच स्त्रियांनी जागवयाची मंगळागौर असो की श्रावणी सोमवार अथवा श्रावणी शनिवार सारं कसं उत्सवाचं वातावरण .

सणांची महती वेगळीच असते. नाग हा शेतक-याचा मित्र मानला जातो. लाखमोलाचं धनधान्य पिकलं तरी ती नष्ट करण्याचं काम उंदीर करतात या उंदरांवर जालिम उपाय अर्थात साप. या प्राण्याप्रति आपलं ऋण नागपंचमीच्या रुपाने व्यक्त केलं जातं.

भावबहिणीचं नातं हा आगळाच-बंध..... या नात्याला उत्सवी रुपात पौर्णिमेला साजरं केलं जातं. भावाच्या हाती रेशम धागाची राखी बांधून बहिणीने आपल्या रक्षणाचं वचन भावाकडून घ्यायचं असा हा सण. हल्लीच्या चौकोनी आणि खास करुन त्रिकोणी कुटुंबाला याचं महत्व असतं तरी अपरिहार्यपणे नातं Miss केलं याची अनुभूती यातून येते.

या पौर्णिमेला कोळी बांधव नारळी पौर्णिमा साजरी करतात. पावसाळयाच्या आरंभी समुद्र खवळलेला असतो त्यामुळे होडया बंदरात आणल्या जातात या खेरीज हा काळ माशांच्या प्रजननाच्या कालावधी असतो त्यामुळे मासेमारी केली जात नाही.
या बंद झालेल्या मासेमारीला पौणिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करीत विधिवत पूजेसह पुन्हा एकदा होडया सागरात सोडून मासेमारीला सुरुवात या दिवशी होते.


श्रावणातील उत्सवाची हा परंपरा श्रावणी आमावस्येला पिठोरी पोळा अर्थात बैलपोळा सणाने होते. काही भागात याला बैदूर असेही म्हणतात. आज यंत्राच्या सहाय्याने शेती केली जात असली तरी परंपरागतपणे बैलांचा शेतीसाठी वापर आपल्या देशात होत आलेला आहे.

बैलांना रंगवून सजावट करणे व त्याला वाजत गाजत गावात मिरवणे यांच्या जोडीला शेतीच्या कामात राबणा-या या मुक्या जिवाला एक दिवस सुटी देणे या सणातून साधले जाते. महाराष्ट्रीय परंपरेनुसार घराघरात खास पुरणपोळीचा बेत या निमित्त बघायला मिळतो.

श्रावण्‍ असा हा आला की सण-उत्सवांची मालिका घेऊनी आला.....असं म्हणत नव्या पिढीच्या भाषेत म्हणता येईल Happy श्रावण.....!.

- प्रशांत दैठणकर
9823199466