Friday 18 August 2017

" स्माईल प्लीज .......! "

प्रत्येक व्यक्तीला विचारा कुणावर प्रेम आहे तुझं ? याचं उत्तर निरनिराळया पध्दतीचं असू शकतं आणि ते रंजक देखील असतं मात्र त्या पलिकडेही जाऊन एक वैश्विक सत्य आपण मानलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला स्वत:वर सर्वाधिक प्रेम असतं आणि ते अगदीच सहाजिक व नैसगिंक आहे.

सांग दर्पणा मी कशी दिसते......?

वयात आलेला तरुणीनेच नाही तर कोणत्याही वयातल्या स्त्री ने विचारलेला सवाल असतो. आपल्याला आवड असते ती आपण स्वत: कसे दिसतो याची. यातूनच दर्पणाची संकल्पना आली.

बाळ श्रीरामाने ज्यावेळी चंद्रजवळ जाण्याचा हट्ट धरला त्यावेळी मातेने हा बालहट्ट पुरविण्यासाठी पाण्यातलं प्रतिबिब दाखवलं असा दाखला आहे. यातूनच पुढे दर्पण अर्थात आरसा आला.


दर्पणात बघून समाधान हे क्षणीक मात्र त्याला दीर्घकाळ चालवायचं तर कसं मग यातून तसबीर रेखाटनं सुरु झालं.. जुन्या राजांच्या अशा भव्य तसबीरी आजही आपणास बघायला मिळतात.

आपल्या दृष्टीस जे दिसतं ते पकडून ठेवण्याचा हा छंद तसा जुना. पण याला नवा आयाम मिळाला तो छाया प्रकाश संयोगाला प्रतिबिंबीत करुन जतन करुन ठेवण्याच्या तंत्रामुळे अर्थात छायाचित्र यानेकी फोटोग्राफ शोधामुळे. छायाचित्र करण्यामागे रसायनांचा वापर झाला आणि पहिल छाया-प्रकाश चित्र सर्वांसमोर आलं तो दिवस मोठा क्रांतीकारी आणि कोटयवधींच्या व्यवसायाला जन्म देणारा ठरला. यातून त्याच प्रमाणात व्यवसायासोबत रोजगाराच्या संधीनिर्माण झाल्या. आणि स्वत:वर सर्वाधिक प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने याला आपल्या आयुष्यात मानाचं स्थान दिलं.

आयुष्यात जगलेल्या क्षणांच्या आठवणींची साठवण या चित्रात आपणास जमा करता यायला लागली. पहिल्या छाया-प्रकाश चित्राचा हा प्रवास छायाचित्रांपासून, चलतचित्र अर्थात चित्रपट व्यवसायाच्या रुपाने मनोरंजन उद्योगात आणि 21 व्या शतकात आता
डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोन च्या रुपानं प्रत्येकाच्या हातात आला.

यातून पुढे आलेल्या " सेल्फी " च्या संकल्पनेने या छायाचित्रणास खूप मोठया उंचीवर नेलं त्यासोबत स्वत:वर प्रेम करणारे काही दुदैवी जीव याच "सेल्फी "च्या नादापायी प्राण गमावत आहेत. असा संमिश्र प्रवास या काळात झाला.

या साऱ्यांची सुरुवात आजपासून 200 वर्षांपूर्वी झाली निलोफर निसे नावाच्या खटपटया संशोधकाने सिल्व्हर आयोडाईडच्या थर असणाऱ्या एका तांब्याच्या तुकडयावर आयोडीनची वाफ देऊन पहिली छाया प्रतिमा कैद केली. हे जगातलं पहिल छायाचित्र होतं.... आज 200 वर्षात यात प्रचंड क्रांती झाली आहे. निसेने नंतर 2 वर्षे अधिक मेहनत करुन हे तंत्रज्ञान यंत्राच्या रुपात एका लाकडी खोक्यात बंदीस्त करुन कोठेही नेता येईल अशी सोय केली हा जगातला पहिला कॅमेरा होता.

प्रत्येकाचं स्वत:वर असणारं प्रेम या कॅमेऱ्याला संशोधनाच्या रुपानं आजच्या अतीअद्ययावत अशा स्मार्टफोन कॅमेऱ्यापर्यत घेऊन आलं आणि या काळात 200 वर्षात छायाचित्रण, छायाचित्रकार अशी स्वतंत्र व्यवसाय श्रेणी त्यात वेगवेगळया प्रकारच्या संधी निर्माण करणारं ठरलं. औद्योगिक असो की निसर्ग छायाचित्रण किंवा वन्यजीव छायाचित्रण, मॉडेलिंग असो की खाद्यपदार्थ छायाचित्रण प्रत्येक क्षेत्रात यात एक "करिअर" म्हणून देखील उत्तम संधी निर्माण करणारं ठरलेल्या या छायाचित्रणाची सुरुवात झाली तो दिवस 19 ऑगस्ट अर्थात जागतिक दिन होय.

या छायाचित्राची क्रेझ किती असू शकते याचा अंदाज आपणास सोशल नेटवर्कींग मधून येवू शकतो. प्रत्येकजण ना-ना प्रकारचे छायाचित्र फेसबूक सारख्या साईटस्‍ टाकताना आपणास दिसेल. फेसबूक ही सर्वात लोकप्रिय नेटवर्कींग साईट असेल असं आपणास वाटत असेल तर ते चुक आहे. जगात सोशल नेटवर्कींगच्या ज्या साईटस् आहेत त्यात ' इन्स्टाग्राम ' सर्वात लोकप्रिय आहे. एप्रिल 2017 अखेर या साईटस् च्या एकूण फॉलोअर्स ची संख्या 700 दशलक्ष इतकी होती. फॉलोअर्सच्या बाबतीत ही साईट सर्वात अव्वल आहे.

' इन्स्टाग्राम ' हे तसं म्हटलं तर फेसबूकचं अपत्य आहे. मार्क झुकरबर्गने 2004 साली फेसबूकची सुरुवात केली त्यानंतर 2010 साली 6 ऑक्टोंबरला ' इन्स्टाग्राम ' अवतरलं पण आज ' इन्स्टा' आघाडीवर आहे. कारण लिहीण्यापेक्षा फोटो हे अधिक सशक्त्‍ माध्य्म आहे.

हजार शब्दाचा निबंध लिहिणे शक्य्‍ आहे पण त्याहीपेक्षा अधिक बोलण्याची ताकद एखाद्या छायाचित्रात असते. साधारणपणे छायाचित्राचं असणारं वेड आता कुठल्या थराला जाईल याबाबत भारतात बोलणं अवघडच आहे. अनेकदा अंत्ययात्रेला उपस्थिती असाही फोटो दिसतो. त्यावेळी जरा खरं वाटते पण याला पर्याय नाही. व्य्‍क्ती तितक्या प्रकृती आणि प्रवृत्ती बाकी काय .

समोरुन कुणी फोटो काढावा यासाठी दुसऱ्या कुणाचं असणं आवश्य्क नाही असा प्रकार अर्थातच ' सेल्फी ' आताचा हा काळ सेल्फीचा काळ तोंडाचा चंबू करुन सेल्फी काढल्या आणि माध्यमात ' व्हायरल ' केल्या जातात. आजची पिढी त्यामुळे 'फोटो क्रेझी' आहे असं म्हणायला हरकत नाही.

छाया-प्रकाशाचं रुप कैद करुन कायमस्वरुपी त्याला जतन करणे आणि हव्या त्या वेळी त्या क्षणाला पुन्हा जिवंत करणे ही छायाचित्राची ताकद त्या छायाचित्रण कलेला आणि समस्त छायाचित्रकारांना .......शुभेच्छा देताना...... स्माईल प्लीज...... अन् क्लीक.......!

-प्रशांत दैठणकर
9823199466

No comments: