Monday 21 August 2017

प्रेमाचं नाव... एक त्या प्रेमाचं गाव

मन किती वेडं म्हणावं...... त्या बहिणाबाईनी सांगितलय तेच खरं..... उभ्या पिकातल्या ढोराप्रमाणे पुन्हा पुन्हा एकाच दिशेला धावायला लागतं. ही ओढ नेमकी कशाची आणि ती आली कुठून..... कदाचित ते क्षण पूर्ण जगले किंवा कदाचित काही अपूरे पडले.....! कळत नाही, पण पण... हो पण मन त्या ठिकाणाहून कधी मागे वळत नाही.
बाहेर नभांच्या दाटीनं काळोख दाटून एव्हाना गडगडाट सुरु झाला अन् एक क्षणात मुसळधारांनी तो बरसायला लागला...... त्या पावसांच्या धारा धरणीकडे धाव घेत होत्या अन् त्या बरसत्या धारांना खिडकीत बसून बघताना मनातल्या भावनाचा प्रवास नेमका उलटा सुरु झालेला....., भावनांचं मळभ दाटून येतं....... भावना भरतीला येवून मनाच्या किनाऱ्यावर धडका मारत असतात. त्याचे तुषार अंगावर येत नाही अन् धारांमधून बरसणारा तो पाऊस देखील ओंजळीत थांबत नाही.....!

आयुष्य..... असच धो-धो बरसून गेलेले आणि ओंजळीतून निसटून गेलेले...... अशा निवांत क्षणी मग अचानक विचार ...... एक आगळाच कोलाहल होतो मनात.......कानात शब्द ते लहानपणीचे पिंगा घालू लागतात...... सहज मिटल्या पापण्यात मग ते बालपण स्पष्टपणे एखाद्या चित्रपटासारखं दिसायला लागतं........शांत ..... आणि निरागस......
अगदी नितळ पाणी कातळावरुन पसरत जाणारा एक झरा....... सारं स्पष्ट होत जातं. त्या निरागस क्षणात आपण होतो पण आसपास स्वार्थाचे चष्मे घालून आपल्याला हव्या त्या रंगांचे जग बघणाऱ्यांची गर्दी होती.......त्यावेळी जाणवलं नाही पण आज त्यानं कधी काळी संपलेल्या बालपणाला पुन्हा एक मोठा भूकंपासारखा हादरा बसतो.

प्रश्न....प्रश्न आणि प्रश्न..... मनात प्रश्नांचं एक अखंड असं रिंगण..... निरागस का होतो ? एवढा भावनाशील का होतो ? त्याही पलीकडे जाऊन पुढचा सवाल त्याच्या हातात हात घालून विचारतो. आजही तितकाच भावनाशील आणि संवेदनाक्षम . असा मी का आहे.....! कारण कदाचित हा मी असा आहे.... . चूकत असेल तर चुकू दे पण असं असणं काही गैर नाही...... मलाच धीर देणारं माझं मन.....! रिंगण वाढत असतं.

पावसाचा भर ओसरतो तसच काहीसं भावनांचं का होत नाही...... आसपास सारं स्वार्थी...... रुक्ष आणि कृत्रिम विश्व बघून का नाही वाटत की आपणही बदलावं स्वत:ला म्हणजे कदाचित वेदना कमी होतील....त्या वेदना उरात घेऊन जगताना क्षणभरही असा विचार मनाला शिवला नाही....... महत्वाचं काय बदल पण कशाचा...... स्वत:च्या प्रामाणिक भावनांमधला नाही शक्य म्हणत वेदनांना कुरवाळायचं.......! असं घडतं अधून मधून......पुन्हा त्याच इमारती दिसतात. कदाचित मनात चित्र कोरलं गेलय पुन्हा बालपणातले ते दिवस दिसतात..... कदाचित यातून मन बाहेरच पडलं नाही......अन् मग तो गंध....... हो तोच गंध तुझ्या
श्वासातून आसमंतात कस्तुरीची बरसात करणारा...... तो कसा येतो....... खेळ रे........ सारे मनाचे खेळ......!

तो गंधा-सुगंधाने भारलेला आठवणींचा डोलारा पाठलाग करत राहतो...... स्थान बदललं......वेळ अन् काळही बदलला......एव्हाना सारं सारं आठवणींच्या पडद्याआड जायला हरकत नव्हती..... पण असं होत नाही....!
तू पुन्हा वळतेस तुझ्या त्या सुंदर केसांच्या जाडजूड वेण्या पाठीवरुन गिरकी घेतात अन् खटयाळपणे उजव्या डोळयावर आकडा करणारी ती एक केसांची बट आणि तुझे शुभ्र डोळे चकाकतात......ओठ विलग होताना आतून मोत्यांची रास डोकावते..... तू हसत पुन्हा स्वागत करतेस अन् मी पुन्हा सारं...... सारं विसरुन तुझ्या प्रेमात तुझ्याच दिशेने नकळत चालायला लागतो...... नकळत.......

खिडकी बाहेर कडाडलेल्या विजेच्या आवाजासोबत झालेल्या शुभ्र लखलखाटाने आसमंत उजळून निघतो अन् जरासं मला माझ्या त्या धावण्यातून पुन्हा वर्तमानात हात खिडकी बाहेर सोडलेल्या स्थितीत मी बघत असतो..... हातावर पावसाचे थेंब नाचत....... नाचत निघून जातात.....
हात पावसात भिजला तरी मनाइतका चिंब झालेला नसतो..... पण..... याही वेळी तुझ्या आठवणीत माझा आजचाही पाऊस निघून गेलेला असतो..... निघून गेलेला असतो....... अगदी तुझ्या सोबतच काळाप्रमाणे.....!

- प्रशांत दैठणकर
9823199466

No comments: